Sunday 19 August 2012

राज्याबाहेरील बाहेरील मराठ्यांचे प्रबोधन करणारा- शिवाजी समाज.




माझे मराठ्यांनो षंढ झालात काय हे पुस्तक एव्हाना मध्यप्रदेश,गुजरात,जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटका, गोवा, छत्तीसगड आदि राज्यात जाऊन पोचले आहे. प्रतिक्रियेच्या निमित्ताने का होईना राज्याबाहेरील मराठा बांधव माझ्याशी संपर्क साधतात आणि आपले राज्य सोडूनही मराठे बाहेरच्या राज्यात स्थाईक झाले आहेत याची मला जाणीव होते. कर्नाटक राज्यातून तर या पुस्तकाचे कन्नड भाषेत भाषांतर करावे असे विनंतीवजा पत्रही प्राप्त झाले आहे. असाच प्रकार गेल्या जून महिन्यात घडला. औरंगाबाद क्रांती चौक पोस्ट खात्यातून मला फोन आला की डॉ.बालाजी जाधव आपल्यासाठी इंदौरहून एक समाचार पत्र आले आहे परंतु त्यावर आपला पूर्ण पत्ता नाही. तर फक्त नाव आणि नंबर आहे. मी माझा पत्ता सांगितला आणि ते समाचार पत्र माझ्या हातात पडले. समाचार पत्राचे नावच "शिवाजी समाज " असे होते. बाहेरच्या राज्यात महाराजांच्या नावाने असे कोणते समाचार पत्र असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणून ते पत्र वाचून मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. महाराष्ट्रतील मराठ्यांना हे माहित नसेल की आपले राज्य सोडून देशभरात सुमारे २ कोटी मराठे आहेत. परंतु आपण आपल्याच मातीत मराठ्यांशी संबंध ठेवत नाही तर मग अशा बाहेरच्या लोकांशी केव्हा ठेवणार?

या प्रसंगापूर्वी मला पानिपत येथे मराठे स्थाईक झाले आहेत याची माहिती होती. त्यांना 'रोड मराठा' असे म्हटले जाते. एवढेच नाही तर औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर गावी माझ्या व्याख्यानाला सुद्धा काही पानिपत येथील मराठे आले होते. मी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले. अर्थात ती मंडळी त्यांच्या कामानिमित्त्य या गावात आली होती. परंतु एवढ्या लांबवरच्या मराठ्यांना भेटल्याचा आनंद काही औरच होता. दरवर्षी १२ जानेवारीला सिंदखेडराजाला आणि ६ जूनला रायगडावर  ही मंडळी प्रचंड संखेने जमते. तर बांधवांनो सांगण्याचे तात्पर्य असे की "मराठा सेवा संघाच्या माध्यमातून " आपण मराठा तितुका मेळवावा, गुण दोषासह स्वीकारावा हे ब्रीद स्वीकारले आहे. मग आता आपल्या समोरची पुढच पायरी म्हणजे या राज्याबाहेर विखुरलेल्या  मराठ्यांना आपल्याशी  जोडणे. त्यांच्या सोबत बेटी व्यवहार प्रस्थापित करणे, कुण्याही मराठी नेत्याचे न ऐकता त्यांची भाषा शिकून घेणे. साधी गोष्ट आहे आजकाल ब्राह्मण समाज सुद्धा सर्व भाषिक संमेलने घेऊ लागला आहे मग आपणही आपल्यातील हे भाषिक आणि प्रांतिक भेद मिटविण्यास सज्ज राहिले पाहिजे. त्या शिवाय मराठा समाज हा देश पातळीवर एक होणार नाही आणि देशाच्या  मुख्य प्रवाहात येणार नाही. आजकाल बरेच लोक देश पातळीवर एकत्र येत आहेत. उदा. जैन समाज, मुस्लीम समाज, बौद्ध समाज, शीख समाज वगैरे वगैरे. मग इतिहासाचा उज्वल वसा आणि वारसा लाभलेल्या आणि अटकेपार झेंडे फडकवलेल्या मराठ्यांनीच यात मागे का बरे राहावे?

मध्य प्रदेशातील मराठा बांधवांना संघटीत आणि प्रबोधित करण्याचे कार्य शिवश्री डॉ.वसंतराव सोनोने आणि शिवमती डॉ.चंद्रकला सोनोने हे मराठा द्वय करत आहेत. हे पती-पत्नी सातत्याने युगानायक पुरुषोत्तम खेडेकर, प्रवीण दादा गायकवाड, छत्रपती संभाजी राजे, अनंत दारवटकर, डॉ.वसंत मोरे आदींच्या संपर्कात असतात. या दोहोंनी मिळून समाजाला जागृत करण्यासाठी "शिवाजी समाज " नावाचे वर्तमान पत्र सुरु केले आहे. हे पत्र ते इंदौरहून चालवतात. या समाचार पत्राचे हे २१ वे वर्ष असून आजपर्यंत याचे ४३ अंक निघाले आहेत. साधारणतः १२ पानाचे हे समाचार पत्र आहे. ज्याचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ  दोन्हीही रंगीत असून अत्यंत आकर्षक असतात. तसे या समाचार पत्राची किंमत १० रुपये असून वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये आहे. ज्यांना कुणाला या अंकाचे आजीवन सभासद व्हायचे असेल त्यांनी १००० रुपये शिवाजी समाजच्या करंट  खात्यात जमा करावेत. बँकेचा पत्ता आहे- "भारतीय स्टेट बँक, नेमी नगर शाखा, इंदौर. कोड नं. ३०३४४, खाते क्र. ६३०४३४५२८४६ " असा आहे. या उपर कुणाला हे समाज प्रबोधनाचे कार्य असेच निरंतर चालू राहावे असे वाटत असेल तर त्यांनी या कार्याला आपापल्या हस्ते मदत करावी.

आपल्या या मुखपत्राच्या माध्यमातून संपादकद्वयांनी काही मुद्दे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रशासनापुढे ठेवले आहेत. आपण अपेक्षा करूया की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु महाराष्ट्रात मराठे हे सत्ताधारी आणि संखेने प्रचंड असल्यामुळे त्यांनी आपल्या कडूनही अपेक्षा व्यक्त केलीय की "महाराष्ट्र के मराठा संघटनो व नेतृत्व वर्ग से यही निवेदन है की महाराष्ट्रा  के बाहर के मराठो के बारे मे विचार करणे का मुद्दा उनके अजेंडे मे हो. महाराष्ट्रा मे जब जब मराठी विरुद्ध  उत्तर भारतीय का सवाल उठता है तो हम लोगोन्के लिये जवाब देना मुश्कील हो जाता है. " या वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणाऱ्या मराठा बांधवांनी योग्य तो बोध घ्यावा आणि राज्याबाहेरील २ कोटी मराठ्यांचे अंतकरण समजून घ्यावे. बाकीच्या मराठ्यांनी पण या लोकांशी संबंध वाढवण्यासाठी विचार करावा. तरच खऱ्या अर्थाने  आपण जग जिंकण्याच्या लायकीचे बनुयात.

जय जिजाऊ !!!

डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
मो-९४ २२ ५२ ८२ ९० 

2 comments:

  1. माननीय जाधव साहेब नमस्कार! मी आपला ब्लॉग वाचत आसतो...मला एक विचारायचे आहे - सर, मराठी / मराठा या शब्दांऐवजी बहुजन हा शब्द वापरला तर...कारण मला असे वाटते कि हे शब्द प्रदेश / जात या पुरतेच मर्यादित आहेत...पण आमच्या शिवाजी राजा चे कार्य ह्या पलीकडे होते...ते धर्म, जात, प्रदेश या पुरते मर्यादित कधीच नव्हते. त्यामुळेच सर्व जाती, धर्म , प्रदेशातील बहुजन त्यांना मानतात...काही चुकीचे बोललो असेल तर माफी करावी...जय जिजाऊ! जय शिवराय!

    ReplyDelete
  2. विरोचन सर प्रथमतः आपण केलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद. आपली सूचना अत्यंत मौलिक आणि आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. इथून पुढे या सूचनेचा नक्कीच विचार केला जाईल. धन्यवाद. जय जिजाऊ !

    आपला- डॉ.बालाजी जाधव.

    ReplyDelete